कहाणी शुक्रवारची (देवीची) Kahani Shukrvar chi (Devi)

 कहाणी शुक्रवारची (देवीची) Kahani Shukrvar chi (Devi)

Kahani-Shukrvar-chi-Devi
Kahani-Shukrvar-chi-Devi



 ऐका शुक्रवारी तुमची कहाणी. एक आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा काही नव्हता. तेव्हा राणीत काय केल ? एका सुइणीला बोलावून आणिलं. अगं अगं, सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुइणीनं कबूल केलं. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली, आणि तिला सांगू लागली की, बाई ग, तू गरीब आहेस. तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव. मी तुझं बाळंतपण फुकट करीन. तिनं होय म्हणून सांगितलं.

दिव्यांच्या अवसेची कहाणी

नंतर सुईण राणीकडे गेली. बाईसाहेब, आपल्या नगरांत एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार आहे. तिला दुसरा महिना आहे. लक्षणं तर सर्व मुलाचीच दिसतात. तेव्हा कोणासही न कळता आपल्या वाड्यापासून तिच्या घरापर्यंत एक गुप्त खणावं. आपणास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हांस तो मुलगा नाळेसह आणून देईन. हे ऐकताच राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस गेले तसतसे डोहाळ्याचे ढंग ती करू लागली. पोट दिसावे म्हणून तिने त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या. भुयार तयार कलं. नऊ महिने होताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे त्या ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं.

 

सुइणीला बोलावू धाडले. त्याबरोबर तुम्ही पुढं चला, मी आलेच म्हणून सांगितलं, आणि ब्राह्मणाच्या घरी आली, सुईण म्हणाली, बाई ग, तुझी आहे पहिलीच खेप. डोळे बांधून घे म्हणजे भिणार नाहीस. नाही बांधलेस तर उगाच भिशील. असं सांगून डोळे बांधले, ती झाली. मुलगा झाला. सुइणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला, आणि एका वरंवटयास कुंचा बांधून तो त्या बाळंतिणीपुढे ठेविला. मग बाईचे डोळे सोडले. बाई, तुला वरवंटाच झाला, असं ती सांगू लागली.

  'कहाणी शुक्रवारची (देवीची) Kahani Shukrvar chi (Devi)'

तिने नशिबाला हात लावला. मनात दुःखी झाली. सुईण निघून वाड्यात गेली; राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी सर्व गावभर पसरली. मुलाचे कोडकौतुक होऊ लागलं. इकडं ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावणमासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी, आणि नमस्कार करून म्हणावं की, जय जिवतीआई माते, जिथं माझं बाळ असेल तेथे सुखी ठेव, असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते या मुलाच्या डोक्यावर आपले पडत. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीच्या मांडवाखालून जाणं वज्यं, तांदळाचं धुवण ओलांडण बंद. याप्रमाणं ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरावयास निघाला.

 

त्या दिवशी ही न्हाऊन आपल्या अंगणात राळे निवडीत बसली होती. तेव्हा त्याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला व रात्री हिची भेट घ्यायची असा निश्चय केला. रात्री हिच्या घरी आला. दारात गाय व वासरू बांधलेली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईस म्हणाले, कोणत्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला ? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जायला भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय ? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी जाऊन आपल्या आईकडून काशीस जाण्याची परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला. ह्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती पाचवी-सहावीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला. पाचवीचा दिवस होता.

 

राजा घरात निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटेत पसरलं आहे ? जिवती उत्तर करते, अगं अगं, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे, मी काही त्याला वलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आई-बाप चा करीत बसली होती. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तररात्र झाल्यावर सटवी व जिवती आपल्या रस्त्यानं निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणानं राजाचे पाय धरले. आज तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचा दिवस आणखी मुक्काम करा, अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री ह्याच- प्रमाणं प्रकार झाला.

दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला. पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली, पिंड देते वेळी ते घेण्याला दोन हात वर आले, असं होण्याचं कारण त्याने ब्राह्मणास विचारले. ते म्हणाले, घरी जा, सान्या गावातल्या बायका-पुरुषांना जेवावयास बोलाव म्हणजे याचं कारण समजेल. त्याच्या मनाला मोठी चुटपूट लागली. घरी आला. मोठ्या थाटानं मावंद केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली की, कोणी चूल पेटवू नये, सगळयांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला. मला जिवतीचं व्रत आहे नेम पुष्कळ आहेत. ते पाळले तर येईन. राजानं कबूल केलं. जिथं तांदळाचं धुवण होतं ते काढवून तिथं सारवून त्यावरून ती ते आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवा- खालून गेली नाही.

 

दर वेळेस जियं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे. पुढं पानं वाढली. मोठा थाट झाला. राजानं तूप वाढण्यास घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला व तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम येऊन पान्हा फुटला. तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या. त्या राजाच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून बसला. काही केल्या उठेना. तेव्हा आई आली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय ? तिनं सांगितलं की, ती तुझीं खरी आई, मी तुझी मानलेली आई आहे. असं सांगून तिनं सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापांना राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून दिला व आपण राज्य करू लागला. तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली तशी ती तुम्हां आम्हांस होवो. ही साठां उत्त- रांची कहाणी पाचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

 

महालक्ष्मीची कहाणी साठी याला टच करा