'कहाणी पाचा देवांची Kahani Pacha Devachi'
ऐका पाची देवांनो, तुमची कहाणी. एके दिवशी काय झालं ? ईश्वरपार्वती पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघाले. एका मुक्कामी उतरले. पार्वती पादसेवा करू लागली. तिचे हात कठीण लागले. तिला एका गरीब ब्राह्मणाच्या बायकोचे बाळंतपण करायला सांगितले. तुझे हात कमळासारखे मऊ होतील. पार्वतीन ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण केलं. ती फार उतराई झाली. पार्वतीला म्हणाली, तू माझी मायबहीण आहेस. मला काही वाण- वसा सांग. तिनं तिला वसा सांगितला. तो काय सांगितला ? चातुर्मास आला. आखाडी दशमी आली म्हणजे गणपतीची पूजा करावी, दूर्वा वाहाव्या, मोदकांचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी. कार्तिकी दशमीस ब्राह्मण सांगून आपल्या वशाचं उद्यापन करावं.
याचप्रमाणं विष्णूचं पूजन करावं, तुळशीपत्र बहाव, खिरीचा नैवेद्य दाखवावा. वर तुपाची धार धरावी आणि कार्तिकात ब्राह्मण सांगून उद्यापन करावं, तसेच नंदीस स्नान घालावं, आघाडयाचं पान वाहावं, खिचडीचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी, ब्राह्मण सांगून उद्यापन करावं. तसेच महादेवास स्नान घालावं, बेलाची पानं वाहावी, दहीभाताचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी आणि ब्राह्मण घालून उद्यापन करावं. तसंच पावंतीस स्नान घालावं, पांढरी फुलं बाहावी. घारगेपुन्यांचा नैवेद्य दाखवावा आणि कार्तिकात ब्राह्मण जेवू घालून उद्यापन करावं.
'कहाणी पाचा देवांची Kahani Pacha Devachi'
हा वसा कधी घ्यावा ? आखाडी दशमीस घ्यावा. कार्तिकी दशमीस संपूर्ण करावा. असा तिनं वसा सांगितला आणि आपण अदृश्य झाली. बरेच दिवस झाले. इकडे पार्वतीनं काय केलं ? गरिबांचा वेष घेतला. त्या बाईस भेटावयास गेली. तिनं हिला ओळखलं नाही. पार्वतीला राग आला; गणपती- कडे गेली, सगळी हकीकत सांगितली. ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून घे. ही गोष्ट मजपासून घडावयाची नाही. ती काही उतायची नाही, मातायची नाही. तिनं चार महिने पूजा केली, दूर्वा वाहिल्या, मोदकांचा नैवेद्य दाखविला, वर तुपाची धार धरली. मी काही तिचं वैभव काढणार नाही.
असं गणपतीनं म्हटल्यावर ती 'विष्णूकडे गेली. सगळी हकीकत सांगितली. ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून घे. ही गोष्ट मज- कडून घडावयाची नाही. ती उतली नाही, मातली नाही, तिनं माझी चार महिने पूजा केली, तुळशीपत्र वाहिले, खिरीचा नैवेद्य दाखविला, वर दुधाची धार धरली. मी काही वैभव काढणार नाही. तेथून उठली, नंदीकडे गेली. सगळी हकीकत सांगितली. ती उतली आहे, मातली आहे, तिचे वैभव काढून घे. ही गोष्ट मज- कडून घडावयाची नाही. ती काही उतली नाही, मातली नाही.. तिनं माझी चार महिने पूजा केली, आघाड्याचं पान वाहिलं, खिचडीचा नैवेद्य दाखविला, वर तुपाची धार धरली. मी काही तिचं वैभव काढणार नाही.
तेथून उठली व महादेवाकडे गेली. सगळी हकीकत सांगितली. ती उतली आहे, मातली आहे, तिचे वैभव काढून घे. ही गोष्ट मजकडून घडावयाची नाही. ती काही उतायची नाही, मातायची नाही, तिनं माझी चार महिने पूजा केली. बेलाची पानं वाहिली, दहीभाताचा नैवेद्य दाखविला, वर तुपाची धार धरली. मी काही
तिचं वैभव काढणार नाही, तू गरिबाच्या वेषानं गेलीस म्हणून तुला तिनं ओळखलं नाही. पहिल्या वेषानं जा, म्हणजे ती तुला ओळखील. श्रीमंती वेषानं पार्वती पुन्हा गेली, तो तिला बसावयास पाट दिला, पाय धरून आभारी झाली. तिला पार्वती प्रसन्न झाली व उत्तम आशीर्वाद दिला. जसे तिला पाची देव प्रसन्न झाले तसे तुम्हां आम्हांस होवोत. ही साठा उत्तरांची कहाणी पाचां उत्तरी सुफळ संपूर्ण.
